Friday, June 24, 2011

जगणे माझे

कधी रुसवा होतो माझाच माझ्या देवाशी
मग रंगते भांडण माझेच माझ्याशी
स्वतःला मग स्वतःच समजवायचे
हृदयावर ओरखड्यांचे गोंदण सजवायचे

रंगही माझेच अन ढंगही माझेच 
रुसणेही माझेच अन फसणेही माझेच
त्याला तर नसते घेणे कशाशीच ...
जगणेही माझेच अन मरणेही माझेच

---BinaryBandya™ 

Monday, June 6, 2011

भिजलेला सूर्य

उन्हाळाभर मानगुटीवर बसलेला सूर्य
चार महिने नको तेवढा तापला
कालच्या पावसासोबत मात्र 
विरघळत विरघळत मातीत मिसळला

इथेतिथे साचलेल्या पाण्यात मग,
पावसानंतर का होईना
पण लहान मुलांसारखाच चिंब भिजला

मावळतीला बुडता बुडता मग,
ढगांच्या दुलईत
लहान मुलांसारखाच निजला


नुकताच पाउस पडून गेला होता. बाहेर फेरफटका मारावा म्हणून थंड हवेत फिरायला आलो.
पण थोड्याच वेळात सूर्य महाराज ढगातून बाहेर येऊन दर्शन देऊ लागले.
बिचारा रस्त्यावर साठलेल्या पाण्याच्या डबक्यात स्वतःला बघत बसला होता.
वाटले मागची ४ महिने नुसता मानगुटीवर बसून होतास, घामाने भिजवत होतास.
आता बघ कसं तुझं अगदी पिल्लू झालंय यार ...
त्या पाण्यात उडी मारायचा मोह मी टाळलाच. अन मनातल्या मनात म्हटले
"खेळ बाबा  तुही पाण्यात , तुलाही कधी कधी लागतच असेल की तहान"


---BinaryBandya™ 

Monday, April 4, 2011

फसवणूक

लहानपणी परीक्षेसाठी ,
तरुणपणी  नोकरीसाठी ,
कधी जोडले मी हात  
तुझ्यासमोर प्रेमासाठी    

तुझं हे मात्र नेहमीचंच,
ऐकून न ऐकल्यासारखे करायचे 
अन स्वतःचे देवपण विसरायचे 

पण आज काहीच न मागता जाणार
देवा आज तुला मी फसवून जाणार


आताही ह्याच विचारात असशीलच 
"आज हा काय मागणार ?"
पण आज कालच्यापेक्षा वेगळा आहे
आज माझा माज जरा वेगळा आहे
तुझ्यासमोर झोळी नाही पसरणार 
देवा आज तुला मी फसवून जाणार 

कितीही बसुदे चटके मी सोसेन 
कोसळू दे आभाळ ते मी तोलेन
मंदिरात मी तेंव्हा येईनही
नमस्कार मी घालेनही 
पण  ...
काहीही न मागता मी परत जाणार  
तेंव्हासुद्धा देवा तुला मी फसवून जाणार 


Friday, April 1, 2011

माझा रंग निळा

कोणाचा भगवा,
कोणाचा हिरवा,
कोणाचा गडद निळा,
सध्या असे काहीच नाही
सगळ्या भारताचा रंग एकच
फक्त निळा ...


खरेच क्रिकेट रॉक्स..  



---BinaryBandya™ 

Thursday, February 17, 2011

तरीही लिहा..

कागद म्हणतो लिहा ,
लेखणी म्हणते लिहा,
दौतीतली शाई म्हणे
लिहा लिहा अन लिहा

काळजातल्या तक्रारी
फुंकर मागतात,
अंधारातले कोपरे 
उजेड मागतात,
मग,
लिहा लिहा अन लिहा

अवघडलेले शब्द
वाटा मागतात,
नेहमीच्या वाटा
बदल मागतात,
मग,
लिहा लिहा अन लिहा.


मन म्हणते मला सुचत नाही,
गाणे म्हणते तुला जमत नाही,
कोणी म्हणे ताल नाही,
कोणी म्हणे चाल नाही,
तरीही,
लिहा लिहा अन लिहा. 


---BinaryBandya™

Saturday, December 25, 2010

माझे खोलपण असेच उथळ उथळ

 
माझ्यात खोलवर पोहचायचे
सगळेच दरवाजे बंद,
सगळ्याच वाटा बंद,
पण माझा कोश आणि मी
दोघेही वाट बघतोय,
माझ्या माणसांची ...
  
तुम्हाला सापडेल अशी 
एखादी चोरवाट,
अतिशय खोल जाणारी
अगदी माझ्यातल्या "मी" पर्यंत...
 
पण हो मनापासून
मला भेटायची ओढ,
माझ्यापर्यंत पोहोचायची 
इच्छा असणाऱ्यासाठीच,
अशा चोरवाटा,
"जाणून बुजून ठेवलेल्या चोरवाटा !!!" 

वरून जरी वाटत असेल "मी" उथळ 
पण माझ्या तळाशी पोहोचणे तेवढेच कठीण 
कारण माझे खोलपण असेच फसवे 
अन उथळ उथळ...
 
 

Saturday, December 11, 2010

माझी पहाट

स्वप्न ,
मेंदूने विणलेले कुठलेतरी सुरेख जाळे
स्वप्नांचे तुकडे, 
विणलेल्या जाळ्याच्या छेदबिंदुवर विखुरलेले 


माझे मन ,
ते तुकडे जमवून काहीतरी अर्थ काढू पाहणारे  अन माझे जगणे,
पहाटेच्या सुंदर सुंदर स्वप्नात असे विखुरलेले

सुर्य ,
ते सुंदर जाळे विस्कटायला मुद्दाम लवकर उगवलेला
अन माझे मन ,
त्या तुकड्यांचा अर्थ लावता लावता रडकुंडीला आलेले

नेहमीचेच ठरलेले ,
सूर्याचा विजय अन माझी हार ..
हार नेहमीचीच ,
पण ती लगेच विसरून पण जातो   

पण तुटक तुटक आठवणारी स्वप्ने मात्र
मनाला हुरहूर लावून जातात