Tuesday, February 23, 2010

फसलो मी

माझी माणसे शोधुन दमलो मी
माझी जात जाणुन फसलो मी

माझी भाषा कळेनाच कुणाला इथे
अनोळख्या जनावरांच्या कळपात घुसलो मी

माणंसातला माणुस नाही ओळखला
माझ्याच आरश्यातल्या प्रतिबिंबाला फसलो मी

भावना अन प्रेमाचा दुष्काळच इथे
आयुष्यभर दगडांतच जगलो मी

कुणाला शिकवायची निती-मुल्ये इथे
संस्कार घेउन राक्षसांत वाढलो मी

माझे भविष्यच अंधुक दिसतय आता
मुडदा होउन वर्तमानातच जगलो मी

यमाच्या रेड्याला म्हैस समजलो
मरताना हसलो अन तिथेसुद्धा फसलो मी


----

Thursday, February 4, 2010

कधी कधी

कधी कधी नभालाही वाटत असेल
घ्यावे धरतीला मिठीत
कधी कधी ढगानाही वाटत असेल
शिरावे ह्या दरीच्या कुशीत

कधी कधी शिखरालाही वाटत असेल
खोल खोल दरीत उतरावे
अन कधी कधी दरीलाही वाटत असेल
उंचावरून जग पहावे

कधी कधी पावसालाही वाटत असेल
ओलेचिंब भिजावे
अन कधी कधी थंडीलाही वाटत असेल
उबदार गोधडीत शिरावे

कधी कधी उन्हालाही वाटत असेल
सर्वस्व सावलीला द्याव
अन सावल्यांनाही वाटत असेल
सोनसळी उन्हात नहाव ..

कधी कधी शब्दानांही वाटत असेल
कवितेला सजवावे
कधी कधी कवितेलाही वाटत असेल
शब्दांचेच होऊन जावे ...


---