Monday, December 14, 2009

तु ये


माझ्या अंगणात रांगोळी घालाया ये
परसदारात रातराणी फुलवाया ये

एकट्या माझ्या राती , एकटी माझी स्वप्ने
चांदण्या राती माझी स्वप्ने सजवाया ये

दिवस बेशिस्त, रात्र अस्वस्थ , कुस बदलुन थकते रात्र माझी
ह्या बैचेन रातीच्या प्रश्नांची उत्तरे सांगाया ये

तुझ्याशी भांडायचय पण मन कधीच धजावत नाही
असेच एकांती रुसुन-फुगुन माझ्याशी गोड गोड भांडाया ये

तुझ्यासाठी जिव अर्पण , तुझ्यासाठी माझे डोळे दर्पण
ह्या दर्पणासमोर लाजाळुसारखे लाजाया ये

मी उंबर्‍यात एकटाच उभा
आपल्या घराला तोरण बांधाया ये

मी कधीचीच वाट पाहतोय तुझी
देव्हार्‍यात तुझ्या घरचा कृष्ण ठेवाया ये
 
---Friday, December 4, 2009

वेडा


एक एस.टी 'स्टँडवरचा माणूस'
मळलेली चड्डी ,
मळकट अन तेलकट असा लांबसा सदरा,
विस्कटलेले केस,
दोन पायात दोन वेगवेगळ्या चपला....

स्वता:शीच काहीतरी बोलत असतो,
कधी झाड , कधी पक्षी ,कधी प्राणी कोणाबरोबरही तो बोलत असतो,
प्रत्येकात तो स्वतःच्या कुठल्यातरी नातलगाला शोधत असतो...

अन हो त्याच्याकडे एक चिंध्याचे गाठोडे पण आहे,
त्यातल्या तो काही चिंध्या काढतो , काही फेकुन देतो ,
काही फाडतो, काहींच्या गाठी मारतो,
काही नवीन शोधुन आणुन त्यात परत भरतो,

हिच त्याची दिनचर्या....

त्याला सगळेच वेडा म्हणतात का कोणास ठावूक ?

मीही स्वता:शीच बोलत असतो तासनतास..
कुठल्याही माणसात शोधतो की मी पण मित्र ,नातलग, प्रेम...
माझ्याही विचारांचे माझ्यापाशी एक न दिसणारे गाठोडे आहे,
त्यातुन मी काही विचार मांडतो ,
काही काढुन फेकुन देतो , काही विचार बदलतो ,
काही नव्याने गाठोड्यात भरून ठेवतो..
मला मात्र कोणीच वेडा म्हणत नाही!!!

तो त्याच्या मनात येईल ते करतो
मी मात्र आतल्या आत घुसमटतो
मग कोण वेडा ? मी का तो...

तो आतही तसाच जसा बाहेरही
मी मात्र आतुन एक अन बाहेर एक..
मग कोण वेडा ? मी का तो...

त्याला नाही कुठली जात-पात
नाही कुठला देव अन धर्म
नाही कुठले बंधन
नाही कुठले प्रेम अन मत्सर
एकट्याच्या जगात एकटाच राजा...


अन मी मात्र अडकलोय
नको त्या बंधनात, नको त्या प्रेमात
नको त्या धर्मात, अन नको त्या देवात
केवढी गर्दी माझ्याभोवती
आप्तांची, मित्रांची, भावनांची, देवांची,
धर्मांची, जातींची, कुळांची अन माझ्याच विचारांची
तरीही मी एकटाच, सगळ्यात एकटाच....
मग कोण वेडा ? मी का तो...


त्याची जात, पात, धर्म, नाव, ओळख
सगळे काही एकच - वेडा अन फक्त वेडा
अन माझ्याकडे पहा..
एकही स्वता:ची ओळख नाही..
कोण मला हिंदु म्हणतो...
कोण मला मराठा , कोण ब्राह्मण
मग कोण वेडा ? मी का तो...---Wednesday, November 18, 2009

नवे जग

नवे जग

देवा हवाय मला एक खोडरबर ...
नको असलेल्या आठवणी, मनपटलावरुन अलगद , हळुवार
एकही ओरखडा न ठेवता पुसणारा...

हवाय मला एक आयुष्याचा कॅनवास ,
अगदी कोरा कोरा, पांढराशुभ्र
एकही रंग नसलेला ,
एकही ओरखडा नसलेला...
सगळच नवं कोरं...
रंगही नवे , कुंचलाही नवा...
चित्र चितारणार तेही नवेच...

देवा हवाय मला एक नवा कोरा आरसा
अगदी नवा...
कुणीच, कधीच
त्यात आपले प्रतिबिंब पाहिले नसावे...
ज्या आरश्यात मी स्वता:लाच नव्याने ओळखावे,
असा आरसा...


---

Friday, November 6, 2009

रस्तेच हरवले


गाव आहे तसाच आजही,
कुठे काय ओसाड झालय ?
पण माझ्या मनातले "ते गाव" हरवले आहे

माझे कट्टे, त्या टपर्‍या, आहे तिथेच, आहे तशाच
तो गोंधळ आहे तसाच , तो दंगा आहे तसाच
फक्त ते माझे "जुने मित्र" हरवले आहेत

तु जशी होतीस तशी आजही ,
तु बदलली नाहीसच...
फक्त तुझ्यातली "माझी परी" हरवली आहे

मी ही आहे तसाच आहे,
मी हरवलो नाहीच...
फक्त तुझ्याकडे येणारे माझे रस्तेच हरवले आहेत

---
Tuesday, November 3, 2009

तुला गवसण्यासाठीच.म्हणतेस माझ्या छोट्या छोट्या गमतींना कसा काय फसतोस ?
छोट्या छोट्या पैजा कशा काय हरतोस ?

हरतो अन फसतो...
तुझ्या चेहर्‍यावरचं एक हास्य बघण्यासाठीच...
अगं हरतो अन फसतो तुझ्यासाठीच , तुला जिंकण्यासाठीच.

म्हणतेस सारखा सारखा रस्ता काय चुकतोस ?
त्याच त्याच रस्त्यावर परत परत का हरवतोस ?

चुकतो अन हरवतो...
तुझ्या सहवासाचे चार क्षण जास्त मिळवण्यासाठीच...
चुकतो अन हरवतो पण तुझ्यासाठीच , तुला गवसण्यासाठीच.

---


Wednesday, October 28, 2009

कधी कधी...

कधी कधी तरसतो मी
कुठलीतरी धुन ऐकण्यासाठी

कधी कधी एकटाच बरळतो मी
जे नसतेच कुणाला कळण्यासाठी

कधी कधी मुद्दाम हरतो मी
तुला जिंकताना पाहण्यासाठी

कधी कधी एकटाच हसतो मी
जगापासुन लपवलेल्या कारणासाठी

कधी कधी लिहलेले खोडतो मी
तुझे नाव जगापासुन लपवण्यासाठी

कधी कधी वेड्यासारखा वागतो मी
शहाण्यापासुन दुर जाण्यासाठी

कधी कधी उगाच लिहतो मी
धावणार्‍या मनाला कागदावर बांधण्यासाठी


---Wednesday, October 7, 2009

अट्टहास


माझं जगणं शब्दात मांडायचा अट्टहास का ?
शब्दांच्या पलिकडचे वर्णन करायचा अट्टहास का ?

मात्रा,काना ह्यात न अडकता जगा मुक्तपणे
जिवण कवितेत कोंडायचा अट्टहास का ?

उगाच फुका कशाला मारता
स्वता:कडे नाही ते दाखवायचा अट्टहास का ?

एखाद्यावर निर्वाज्य , निर्मळ प्रेम करा
उगाच त्याच्यावर प्रेम लादायचा अट्टहास का ?

काही क्षण फक्त अनुभवायचे
क्षणांना छायाचित्रात बांधायचा अट्टहास का ?

घे ना डोळ्यांची भाषा समजुन
सगळं काही शब्दांत सांगायचा अट्टहास का ?

नवीन काहीच लिहीत नाही मी तरीही
जुन्याच शब्दांत नवीन काहीतरी शोधायचा अट्टहास का ?


---Thursday, October 1, 2009

येडा टिंब


एक अनुस्वार नाकातुन गाणारा
एक स्वल्पविराम मधेच थांबणारा

एक अर्धविराम अर्ध्यात थकलेला
अन पुर्णविराम रस्त्यात झोपलेला

अन मी एक येडा टिंब
बरेच काही सांगणारा
कधी मी अनुस्वार तर कधी पुर्णविराम,
तुम्ही द्याल तो अर्थ कागदावर सांडणारा


---Tuesday, September 29, 2009

मुजरा


स्वयंभु मी, मुजरा घालत कुणाच्या सदरेत नाही
वगळले मलाच, नाव माझे कुठल्याच बखरेत नाही

हरहुन्नरी मी, बिलंदर होउन जगलो
पण खासा कुणाच्या भरलो नजरेत नाही

सगळे दिवस काळ्या आमावस्याच
माझा चंद्र अजुन माझ्या नजरेत नाही

सगळ्या वरवरच्या मलमपट्या
अंतरीच्या तारा छेडणारी नशा मदिरेत नाही

सजावट एकमेकांना भुलवण्यासाठीच
गणेशास बांधेल ती भक्ती कुठल्याच मखरेत नाही


---

Tuesday, September 8, 2009

नशा

भुतकाळ आठवुन जगण्यात एक नशा आहे
आठवणी उगाळुन रडण्यात एक नशा आहे

दोष हा सारा तुझ्या आठवणींचाच
तुला आठवण्यात एक नशा आहे

कुणाला शहाणे होउन जगायचे आहे इथे
वेडे होउन तुझ्यावर मरण्यात एक नशा आहे

मुक्कामाला कोणाला पोहचायचे आहे इथे
तुला शोधता शोधता हरवण्यात एक नशा आहे

फुलांच्या मागे कुणाला फिरायचे आहे इथे
मोगरा होउन तुझ्या केसांत माळण्यात एक नशा आहे

दुसर्‍यांचा गझलांचा का घेउ सहारा इथे
स्वता:च्या शब्दांत प्रेम मांडण्यात एक नशा आहे


---

Monday, August 17, 2009

मी एक सिग्नल पिवळा

न तांबडा न हिरवा , मी एक सिग्नल पिवळा
कायम गोंधळलेला ,मी एक सिग्नल पिवळा

तांबड्यापेक्षा कमी अन हिरव्यापेक्षा जास्त
स्वत:ची किम्मतच माहीत नसलेला ,मी एक सिग्नल पिवळा

कुणी पाळला , कुणी तोडला
कुणी स्वत: माझ्यासारखाच गोंधळलेला, मी एक सिग्नल पिवळा

माझे सांगणे काहीच नाही , तसेही ऐकायला कोणीच नाही
गर्दीत असुनही नसलेला , मी एक सिग्नल पिवळा

मला द्यायचे काही नाही , आणि घ्यायचे काही नाही
सगळ्यांशी संबध तोडलेला , मी एक सिग्नल पिवळा

भारत जिंकला , भारत हरला , कुणी जगला , कुणी मेला
कशाचे सोयर-सुतक नसलेला , मी एक सिग्नल पिवळा

माझ्याकडे प्रेमही नाही आणि द्वेषही नाही
भावनांचा सागर आटलेला , मी एक सिग्नल पिवळा

असेच का ? अन तसेच का ?
स्वता:चे ठाम मत नसलेला ,मी एक सिग्नल पिवळा

जीव आहे म्हणुन जगतो , का जगतो म्हणुन मरणार
माझ्या मरणाशीही घेणे-देणे नसलेला , मी एक सिग्नल पिवळा


---

Thursday, August 13, 2009

माझी सोनपरी

लग्नानंतर पहिल्या दिवाळीची पहिलीच पहाट,
गावाकडच्या घरासमोरील भल्या मोठ्या अंगणात
फक्त ती, मी आणि सुंदरशी पहाट,

ती नुकतीच नाहलेली, ओलेत्या केसांनी तुळशीवृंदावनासमोर उभी,
तिच्या हातात पुजेचे ताट, ताटात निरांजन
तिच्या चेहर्‍यावर पडलेला निरांजनचा प्रकाश ,
त्या प्रकाशाने नाहुन तिचा चेहरा सोनेरी झालाय ,
अजुनच खुललाय , अजुनच सुंदर दिसत आहे
माझी सोनपरी..शब्दच नाहीत वर्णन करायला
कपाळावरचे कुंकु थोडेसे फिसकटले आहे
पण का कोणास ठाउक ते व्यवस्थित नाहीये करायचे मला
तशीच ती सुंदर दिसते आहे

ती एवढी सुंदर कधीच दिसली नव्हती मला
माझ्या डोळ्यांची पापणीच खाली पडत नाहीये
हे क्षण इथेच थांबावेत
आणि मी तिला असेच पहात रहावे

उदबत्त्यांचा सुगंध दरवळतोय
पण मी मात्र वेगळ्याच सुगंधाने भारुन गेलोय..

मनात आता वाट पाहतोय पुढच्या दिवाळीची आणि अशाच एका पहाटेची


---

Sunday, August 2, 2009

वेडे शहाणपण

शहाण्यांच्या या जगात वेड्यासारखे जगायचे,
वेड्यासारखे जगुनच शहाणे बनायचे

शहाण्यांचे नियम त्यांच्यासाठीच, आपल्याला काय करायचे,
आपण नियम तोडायचे आणि वेड्यासारखे जगायचे

त्यांची तत्वे , त्यांचे जगणे त्यांच्यासाठीच आपल्याला काय करायचे,
आपण आपली वेडी तत्वे पाळायची आणि वेड्यासारखे जगायचे

शहाण्यांचे शहाणेपण आणि वेड्यांचे वेडेपण
यातले नक्की वाईट काय ?
शहाण्यांचे वेडेपण आणि वेड्यांचे शहाणेपण
यातले नक्की चांगले काय ?

शहाण्यासारखे जगायचा प्रयत्न तर सगळेच करतात,
कुणीतरी वेड्यासारखे जगायलाही हवे
ह्या जगाला "वेडे शहाणपण" शिकवायला हवे


---

बेधुंद

ह्या वादळ-वार्‍याला पकडुन मुठीत
दुर कुठेतरी भिरकवायचय,
ह्या समुद्राच्या लाटांवर स्वार होउन
वार्‍याच्या वेगाने धावायचय,
बेधुंद होउन, बेधडक जगायचय , मनात येयील ते करायचय

ह्या सगळ्या पर्वतशिखरांना सर करुन
त्यानांच ठेंगा दाखवायचाय,
जमिनीला जिथे आकाश भेटते तिथे जायचय,
आणि क्षितीजावर माझे नाव कोरुन यायचय,
बेधुंद होउन, बेधडक जगायचय , मनात येयील ते करायचय

चंद्र तार्‍यांना तोडुन, सखीच्या ओंजळीत द्यायचय,
जिच्यावर करतो प्रेम तिला एकदा भिडायचय,
तिला घेऊन मिठीत , तिच्या डोळ्यात डोळे घालुन
माझे प्रेम तिला सांगायचय,
तिचा हात हातात घेउन जगापासुन दुर पळायचय
बेधुंद होउन, बेधडक जगायचय , मनात येयील ते करायचय

पावसाचा थेंब होउन कड्यावरुन दरीत कोसळायच,
नदी नाल्यातुन , ओढ्यातुन वहात वहात सागराला जाउन मिळायचय,
बेधुंद होउन, बेधडक जगायचय , मनात येयील ते करायचय

ऑफिसला मारुन बुट्टी , बॉसला फाट्यावर मारायचय
हे आयुष्य मला माझ्या मनाचा राजा होउन जगायचय,
बेधुंद होउन, बेधडक जगायचय , मनात येयील ते करायचय

---

फक्त प्रश्नच

पाऊस आला की मला तिची आठवण का येते..
पावसाचा पहिल्या सरीने मन वेडे पिसे का होते..

ह्या प्रश्नांची उत्तरे माझ्याकडे ही नाहीत , तिच्याकडेही नाहीत ...
आणि पावसाकडे तर फक्त प्रश्नच ...

---

Sunday, June 14, 2009

आयुष्य

आयुष्य म्हणजे परमेश्वराला पडलेले एक सुदंर स्वप्न ,
ते स्वप्न खराब करायचा आपल्याला अधिकार नाही.
विचार करा जेव्हा तुम्ही एखादे सुदंर स्वप्न पहात असता आणि मधेच कोणितरी तुम्हाला झोपेतुन उठवते ,
राग येतो ना , वाईट वाटते ना . मग तुमच्या वाईट वागण्याने किंवा दुखी असण्याने परमेश्वराला किती त्रास होत असेल..
म्हणुन सुदंर जगा , आनंदी रहा ...

---