Wednesday, July 21, 2010

लपंडाव

कायम सुरु असतो आठवणींचा लपंडाव
भावनांचा, शब्दांचा, अन नात्यांचा लपंडाव

कधी नाती माझ्यापासून लपतात
तर कधी मी त्यांच्यापासून ...
कधी शब्द माझ्यापासून लपतात
तर कधी मी त्यांच्यापासून ...

इच्छांचेही तेच , नात्यांचेही तेच
प्रेमाचेही तेच अन आप्तांचेही तेच ...

माझे मन, अन माझ्या सावल्या
माझे विचार, अन माझे प्रतिबिंब
ह्यांनी मांडलेला लपाछपिचा डाव
आयुष्य माझे म्हणजे एक लपंडाव


---BinaryBandya™

Monday, July 19, 2010

म्हटलं तर

एक प्रेम तुझे नि माझे
म्हटलं तर सगळ्यांसारखेच
अन म्हटलं तर जगावेगळे

एक खेळ भातुकलीचा तुझा नी माझा
म्हटलं तर सगळ्यांसारखाच
अन म्हटलं तर जगावेगळा

काही शब्द तुझ्या ओठांवरले गुलाबी अन बेधुंद
काही शब्द माझ्या मनातले प्रेमळ अन निश्चल
काही आपल्या नात्यासारखे नाजूक अन हळुवार
अशी ही तुझी-माझी आपली कविता
म्हटलं तर सगळ्यांसारखी
अन म्हटलं तर जगावेगळी

---BinaryBandya™

Thursday, July 1, 2010

फितूर

समोर तू आलीस की जगापासुनच तुटतो ,
कुठेतरी दुर समुद्रात एकटाच भरकटतो,
शप्पथ, समोर तू आलीस की मी मोहरतो...

समोर तु आलीस की
मी माझ्या शब्दांचा बहार पण बघितलाय...
अन समोर तु आलीस की
मी माझ्या कवितेचा जळफळाटही बघितलाय...

समोर तु अन माझे डोळे फितूर
समोर तु अन माझे श्वास फितूर 
समोर तु अन हृदयाची धडधड फितूर
समोर तु अन साला माझे मन पण फितूर...

स्वत:चे काय असे उरलय,
मनात वेगळच काहीतरी भरलय,
किती, कशाला अन का आवरु,
माझ्यातला मीच तुला फितूर...

---BinaryBandya™