Monday, August 17, 2009

मी एक सिग्नल पिवळा

न तांबडा न हिरवा , मी एक सिग्नल पिवळा
कायम गोंधळलेला ,मी एक सिग्नल पिवळा

तांबड्यापेक्षा कमी अन हिरव्यापेक्षा जास्त
स्वत:ची किम्मतच माहीत नसलेला ,मी एक सिग्नल पिवळा

कुणी पाळला , कुणी तोडला
कुणी स्वत: माझ्यासारखाच गोंधळलेला, मी एक सिग्नल पिवळा

माझे सांगणे काहीच नाही , तसेही ऐकायला कोणीच नाही
गर्दीत असुनही नसलेला , मी एक सिग्नल पिवळा

मला द्यायचे काही नाही , आणि घ्यायचे काही नाही
सगळ्यांशी संबध तोडलेला , मी एक सिग्नल पिवळा

भारत जिंकला , भारत हरला , कुणी जगला , कुणी मेला
कशाचे सोयर-सुतक नसलेला , मी एक सिग्नल पिवळा

माझ्याकडे प्रेमही नाही आणि द्वेषही नाही
भावनांचा सागर आटलेला , मी एक सिग्नल पिवळा

असेच का ? अन तसेच का ?
स्वता:चे ठाम मत नसलेला ,मी एक सिग्नल पिवळा

जीव आहे म्हणुन जगतो , का जगतो म्हणुन मरणार
माझ्या मरणाशीही घेणे-देणे नसलेला , मी एक सिग्नल पिवळा


---

Thursday, August 13, 2009

माझी सोनपरी

लग्नानंतर पहिल्या दिवाळीची पहिलीच पहाट,
गावाकडच्या घरासमोरील भल्या मोठ्या अंगणात
फक्त ती, मी आणि सुंदरशी पहाट,

ती नुकतीच नाहलेली, ओलेत्या केसांनी तुळशीवृंदावनासमोर उभी,
तिच्या हातात पुजेचे ताट, ताटात निरांजन
तिच्या चेहर्‍यावर पडलेला निरांजनचा प्रकाश ,
त्या प्रकाशाने नाहुन तिचा चेहरा सोनेरी झालाय ,
अजुनच खुललाय , अजुनच सुंदर दिसत आहे
माझी सोनपरी..शब्दच नाहीत वर्णन करायला
कपाळावरचे कुंकु थोडेसे फिसकटले आहे
पण का कोणास ठाउक ते व्यवस्थित नाहीये करायचे मला
तशीच ती सुंदर दिसते आहे

ती एवढी सुंदर कधीच दिसली नव्हती मला
माझ्या डोळ्यांची पापणीच खाली पडत नाहीये
हे क्षण इथेच थांबावेत
आणि मी तिला असेच पहात रहावे

उदबत्त्यांचा सुगंध दरवळतोय
पण मी मात्र वेगळ्याच सुगंधाने भारुन गेलोय..

मनात आता वाट पाहतोय पुढच्या दिवाळीची आणि अशाच एका पहाटेची


---

Sunday, August 2, 2009

वेडे शहाणपण

शहाण्यांच्या या जगात वेड्यासारखे जगायचे,
वेड्यासारखे जगुनच शहाणे बनायचे

शहाण्यांचे नियम त्यांच्यासाठीच, आपल्याला काय करायचे,
आपण नियम तोडायचे आणि वेड्यासारखे जगायचे

त्यांची तत्वे , त्यांचे जगणे त्यांच्यासाठीच आपल्याला काय करायचे,
आपण आपली वेडी तत्वे पाळायची आणि वेड्यासारखे जगायचे

शहाण्यांचे शहाणेपण आणि वेड्यांचे वेडेपण
यातले नक्की वाईट काय ?
शहाण्यांचे वेडेपण आणि वेड्यांचे शहाणेपण
यातले नक्की चांगले काय ?

शहाण्यासारखे जगायचा प्रयत्न तर सगळेच करतात,
कुणीतरी वेड्यासारखे जगायलाही हवे
ह्या जगाला "वेडे शहाणपण" शिकवायला हवे


---

बेधुंद

ह्या वादळ-वार्‍याला पकडुन मुठीत
दुर कुठेतरी भिरकवायचय,
ह्या समुद्राच्या लाटांवर स्वार होउन
वार्‍याच्या वेगाने धावायचय,
बेधुंद होउन, बेधडक जगायचय , मनात येयील ते करायचय

ह्या सगळ्या पर्वतशिखरांना सर करुन
त्यानांच ठेंगा दाखवायचाय,
जमिनीला जिथे आकाश भेटते तिथे जायचय,
आणि क्षितीजावर माझे नाव कोरुन यायचय,
बेधुंद होउन, बेधडक जगायचय , मनात येयील ते करायचय

चंद्र तार्‍यांना तोडुन, सखीच्या ओंजळीत द्यायचय,
जिच्यावर करतो प्रेम तिला एकदा भिडायचय,
तिला घेऊन मिठीत , तिच्या डोळ्यात डोळे घालुन
माझे प्रेम तिला सांगायचय,
तिचा हात हातात घेउन जगापासुन दुर पळायचय
बेधुंद होउन, बेधडक जगायचय , मनात येयील ते करायचय

पावसाचा थेंब होउन कड्यावरुन दरीत कोसळायच,
नदी नाल्यातुन , ओढ्यातुन वहात वहात सागराला जाउन मिळायचय,
बेधुंद होउन, बेधडक जगायचय , मनात येयील ते करायचय

ऑफिसला मारुन बुट्टी , बॉसला फाट्यावर मारायचय
हे आयुष्य मला माझ्या मनाचा राजा होउन जगायचय,
बेधुंद होउन, बेधडक जगायचय , मनात येयील ते करायचय

---

फक्त प्रश्नच

पाऊस आला की मला तिची आठवण का येते..
पावसाचा पहिल्या सरीने मन वेडे पिसे का होते..

ह्या प्रश्नांची उत्तरे माझ्याकडे ही नाहीत , तिच्याकडेही नाहीत ...
आणि पावसाकडे तर फक्त प्रश्नच ...

---