Tuesday, September 29, 2009

मुजरा


स्वयंभु मी, मुजरा घालत कुणाच्या सदरेत नाही
वगळले मलाच, नाव माझे कुठल्याच बखरेत नाही

हरहुन्नरी मी, बिलंदर होउन जगलो
पण खासा कुणाच्या भरलो नजरेत नाही

सगळे दिवस काळ्या आमावस्याच
माझा चंद्र अजुन माझ्या नजरेत नाही

सगळ्या वरवरच्या मलमपट्या
अंतरीच्या तारा छेडणारी नशा मदिरेत नाही

सजावट एकमेकांना भुलवण्यासाठीच
गणेशास बांधेल ती भक्ती कुठल्याच मखरेत नाही


---

Tuesday, September 8, 2009

नशा

भुतकाळ आठवुन जगण्यात एक नशा आहे
आठवणी उगाळुन रडण्यात एक नशा आहे

दोष हा सारा तुझ्या आठवणींचाच
तुला आठवण्यात एक नशा आहे

कुणाला शहाणे होउन जगायचे आहे इथे
वेडे होउन तुझ्यावर मरण्यात एक नशा आहे

मुक्कामाला कोणाला पोहचायचे आहे इथे
तुला शोधता शोधता हरवण्यात एक नशा आहे

फुलांच्या मागे कुणाला फिरायचे आहे इथे
मोगरा होउन तुझ्या केसांत माळण्यात एक नशा आहे

दुसर्‍यांचा गझलांचा का घेउ सहारा इथे
स्वता:च्या शब्दांत प्रेम मांडण्यात एक नशा आहे


---