Friday, April 1, 2011

माझा रंग निळा

कोणाचा भगवा,
कोणाचा हिरवा,
कोणाचा गडद निळा,
सध्या असे काहीच नाही
सगळ्या भारताचा रंग एकच
फक्त निळा ...


खरेच क्रिकेट रॉक्स..  



---BinaryBandya™ 

Thursday, February 17, 2011

तरीही लिहा..

कागद म्हणतो लिहा ,
लेखणी म्हणते लिहा,
दौतीतली शाई म्हणे
लिहा लिहा अन लिहा

काळजातल्या तक्रारी
फुंकर मागतात,
अंधारातले कोपरे 
उजेड मागतात,
मग,
लिहा लिहा अन लिहा

अवघडलेले शब्द
वाटा मागतात,
नेहमीच्या वाटा
बदल मागतात,
मग,
लिहा लिहा अन लिहा.


मन म्हणते मला सुचत नाही,
गाणे म्हणते तुला जमत नाही,
कोणी म्हणे ताल नाही,
कोणी म्हणे चाल नाही,
तरीही,
लिहा लिहा अन लिहा. 


---BinaryBandya™

Saturday, December 25, 2010

माझे खोलपण असेच उथळ उथळ

 
माझ्यात खोलवर पोहचायचे
सगळेच दरवाजे बंद,
सगळ्याच वाटा बंद,
पण माझा कोश आणि मी
दोघेही वाट बघतोय,
माझ्या माणसांची ...
  
तुम्हाला सापडेल अशी 
एखादी चोरवाट,
अतिशय खोल जाणारी
अगदी माझ्यातल्या "मी" पर्यंत...
 
पण हो मनापासून
मला भेटायची ओढ,
माझ्यापर्यंत पोहोचायची 
इच्छा असणाऱ्यासाठीच,
अशा चोरवाटा,
"जाणून बुजून ठेवलेल्या चोरवाटा !!!" 

वरून जरी वाटत असेल "मी" उथळ 
पण माझ्या तळाशी पोहोचणे तेवढेच कठीण 
कारण माझे खोलपण असेच फसवे 
अन उथळ उथळ...
 
 

Saturday, December 11, 2010

माझी पहाट

स्वप्न ,
मेंदूने विणलेले कुठलेतरी सुरेख जाळे
स्वप्नांचे तुकडे, 
विणलेल्या जाळ्याच्या छेदबिंदुवर विखुरलेले 


माझे मन ,
ते तुकडे जमवून काहीतरी अर्थ काढू पाहणारे  अन माझे जगणे,
पहाटेच्या सुंदर सुंदर स्वप्नात असे विखुरलेले

सुर्य ,
ते सुंदर जाळे विस्कटायला मुद्दाम लवकर उगवलेला
अन माझे मन ,
त्या तुकड्यांचा अर्थ लावता लावता रडकुंडीला आलेले

नेहमीचेच ठरलेले ,
सूर्याचा विजय अन माझी हार ..
हार नेहमीचीच ,
पण ती लगेच विसरून पण जातो   

पण तुटक तुटक आठवणारी स्वप्ने मात्र
मनाला हुरहूर लावून जातात

Friday, November 26, 2010

वेडेपणा

माझे एकटेपण अन माझा वेडेपणा
सोडले तर माझे असे काहीच नाही,
अन तू म्हणतेस वेडेपणा सोड
त्यापेक्षा जगायचे सोड म्हण ना..


---BinaryBandya™

Monday, November 22, 2010

मागच्या जन्मीचे मावळे

@जीवधन


प्रत्येक गडावर असा एखादा तरी मित्र भेटतोच ...
हा मित्र मला जीवधन गडावर भेटला .

गड चढताना, उतरताना ते तुम्हाला साथ करत असतात .

बहुतेक मागच्या जन्मीचे मावळे असावेत ..
राजांकडून वरदान मागून घेतले असावे त्यांनी "प्रत्येक जन्मात गडाची सेवा घडावी आमच्या हातून.."

@तोरणा


नशीबवान ते मावळे ...
ज्यांना राजे पहायला , त्यांच्या सहवासात राहायला मिळाले अन स्वराज्यासाठी लढायला मिळाले ...

---BinaryBandya™

Monday, November 1, 2010

वाट हरवलेल्या काही कविता

माझ्या वहीवरल्या 
अर्ध्यातच वाट हरवलेल्या काही कविता,
कधी कधी भांडण उकरून काढतात माझ्याशी ...


तुझ्यामुळेच आम्ही हरवलो,
आता कळत नाहीये...
जायचे कुठे  ? अन थांबायचे कुठे ?


त्यांची समजूत घालण्याकरता मग,
मी शोधतो अजून एखादी ओळ ..

अन त्यांना मुक्कामाला पोहोचावायाच्या नादात मात्र ,
मी स्वतःच हरवतो ...


---BinaryBandya™