Wednesday, August 31, 2016

बाप्पाची मूर्ती

तसा मी दर वर्षीच येतो
पण वेगवेगळ्या रुपात,
वेगवेगळ्या रंगात,
वेगवेगळ्या आकारात. 

ह्यावर्षी सुद्धा
नवं रूप घेऊन आलो,
नवा रंग घेऊन आलो.

पण नेहमी काहीतरी चुकतेच,
मला कुणी घरी घेऊन जातच नाही.
मी कोणाला आवडतच नाही.

असं कसं मी सुंदर नाही?
की माझ्यात देवपणच नाही?
"निर्मात्यालाच" माहीत.  

निर्मात्या,
संपणार कधी रे हे जन्म-मरणाचे फेरे ?

-- कधीच न विकल्या जाणाऱ्या  बाप्पाच्या मूर्तीचे मनोगत

Friday, March 16, 2012

तेंडूलकर ..

जगाच्या इतिहासात सगळ्यात जास्त हृदयाचे ठोके ज्या माणसामुळे चुकले असा माणूस म्हणजे - तेंडूलकर
(१६ मार्च : आज "हृदयाच्या ठोक्यांचा" फार मोठा घोटाळा झाला - किती कोटी ठोके चुकले ते ब्रम्हदेव calculate करत बसलेत)

 
 
आज भारतातली हृदये आज सगळ्यात जास्त धडधडली,
स्वप्नांचा पाठलाग करताना म्हणे हृदये धडधड करतातच.
"शतकांचे महाशतक" हे महास्वप्न पूर्ण करण्यासाठी १ माणूस १०० कोटी हृदये बरोबर घेऊन लढत होता.
तो जिंकला , मी जिंकलो आणि १०० कोटी लोक जिंकले ..

 
 
काही तेंडूलकरचे critics म्हणे आज तोंडाला काळा रंग लावून फिरत होते आणि सांगत होते "होळीचा रंग अजून उतरला नाही..!!!!

Tuesday, January 3, 2012

ह्रदयात एक झंकार दे


सुचतच नाही, काही शब्द उधार दे
गातच नाही मी, गाण्याची एक बहार दे


नको टांगुस जिवाला, होकारही राहु दे
लटक्या रागात, एक रुसलेला नकार दे

टेकवुन माझ्या छातीवर डोके, तू विसावा घे
अन तुझ्या सुगंधी श्वासाने ह्रदयात एक झंकार दे
 

Friday, December 30, 2011

सचिन ..

 
ब्रह्मा : कलियुगातली सगळी शतके संपली, चला जग बुडवायच्या तयारीला लागा .
विष्णू : थांब ये ब्रम्ह्या !!! तेंडुलकरचे महाशतक झाल्याशिवाय जगबुडी करायची नाय ...
 
 
---BinaryBandya™   

Thursday, December 22, 2011

नवे वर्ष...



 दारूच्या धुंदीत बुडवुन चंद्र
सिगारेटच्या धुरात फुंकून सूर्य
संगीताच्या तालावर थिरकणारे पाय
उजाडले तरी थकलेच नाय
त्यांना नवे काय अन जुने काय ?
वर्ष सरले? कळलेच नाय  





कॅलेंडर भिंतीवर
तारीख डोक्यावर
घड्याळ मानगुटीवर  
जुनी धुंदी उतरलीच नाय
नवे संकल्प? म्हणजे काय ?
तसेच दिवस
अन तशाच रात्री
नवे काय अन जुने काय ?
वर्ष सरले? कळलेच नाय


---BinaryBandya™    

Thursday, October 20, 2011

Personlized देव

व्यक्तिपरत्वे वेगळा देव,
जातीनुसार आगळा देव,
वेशीवर एक, अन गावात एक
गावकुसाबाहेरचा भोंगळा देव

आमचा तुमचा इतिहास एकच
तरीही माझा रंग आगळा
अन तुमचा रंग वेगळा 
आमचा आगळा पुतळा 
अन तुमचा वेगळा पुतळा

मीही मांडला इतिहासाचा बाजार
तुमच्यासारखाच, मला हवातसा
काही बेरजा अन काही वजाबाक्या
Personlized देव तयार हवातसा

---BinaryBandya™   

Saturday, August 20, 2011

आयुष्याची गणिते


सताड उघड्या डोळ्यांनी मी अंथरुणावर पडतो
अन दिवसाचा शिनवटा अंथरुणातच विरतो
मात्र उद्याची गणिते रात्री छतावर जागा शोधू लागतात
अन छतावर चिटकवलेल्या चांदण्या अंधुक होत जातात

चांदण्या साथीला असूनही मग मी भरकटतो
गणितांच्या जाळ्यात अलगद जाऊन अडकतो
एखादे सुटलेले गणित दुसऱ्याच गणितात अडकते
अन एक एक चांदणी छतावरून अलगद गळून पडते

शेवटी छतावर एखादीच चांदणी उरते
तेवढीच डोळ्यात घेऊन माझी रात्र सरते
बरं झालं छतावर मी सूर्य नाही चिटकवला
ह्या गणितांच्या ग्रहणात तोही असता अडकला

---BinaryBandya™