Tuesday, October 19, 2010

मिशीचा पिळ

आयुष्य म्हटले हा माणुस कधीच रडला नाही
नाहीच रडणार न झेपणारा राग कधीच गायला नाही

आयुष्य सजवले मी प्रेमाच्या फुलांनी
आयुष्यात प्रेमाचा मोगरा कधी फुलला नाही

जोडले मित्र जसे माळेमधे मणी
अजुनतरी एकही मणी निसटला नाही

कविता सजवल्या तिच्यासाठी प्रेमाच्या शब्दांनी
एकाही कवितेचा अर्थ तिला समजला नाही

आयुष्यभर गायली पावसाचीच गाणी
ह्रदयात दुष्काळ माझ्या कधीच टिकला नाही

कितीक घाव , कितीक दु:खे सोसली
माझ्यासाठी माझाच एकही शब्द रडला नाही

दैवानेही केले कित्येक वार अन घाव
असा कुठलाच घाव नव्हता जो सोसला नाही

हार-जीतची चिंताच नव्हती मनाला
खेळ असा मांडलाच नाही जो रंगला नाही

प्रश्न्च नव्हता कुणाचे पाय धराण्याचा
कुठल्याही दगडाला देव कधी मानला नाही

शेवटी यम म्हटला आता तरी रड की बाबा
काय करणार मिशीचा पिळ अजुन उतरला नाही


---BinaryBandya™

Friday, October 1, 2010

सोबत

मी कधीच पावसात एकटा भिजलो नव्हतो 
तू सोबत असतानाही आणि हो आताही ..

सोबत असते मला आता ..
पावसाच्या अन तुझ्या प्रेमात पडलेल्या काही कवितांची  


सोबत असते मला आता ..
मनात जपलेल्या तुझ्या स्पर्शाची ...

सोबत असते मला आता ..
मनात जपलेल्या आठवणीतल्या पहिल्या पावसाची ...

आता फक्त सोबत असते तुझ्या आठवण थेंबांची,
अन पावसाच्या थेंबासोबत डोळ्यातील आसवांची ..

---BinaryBandya™

Thursday, September 30, 2010

अयोध्या ...

सध्या अयोध्येत रामही नाही अन रहीमही नाही, 
तिथे जमली आहेत फक्त जनावरे .. 
ज्यांना ना धर्माशी घेणे ना देवाचे देणे ..


---BinaryBandya™

Wednesday, August 25, 2010

पंढरी...

काल  विठूराया  म्हणाला  पंढरीला  विसरला  का ?
त्याला  म्हणालो " नाही  बाबा, आजकाल  आमची  पंढरी  तिकडे  रायगडावर भरते .."

---BinaryBandya™

Monday, August 9, 2010

माझी माणसं ...

मी माझ्याच माणासांना मला फसवायच्या संधी देतोय..

का अन कशासाठी ?

मला काहीतरी पडताळुन पहायचे आहे,
स्वतःला दुसऱ्याच्या नजरेतून बघायचे आहे.

शेवट काय असेल ह्याची भीती नाहीये आता !!
नाही नाही , तो शेवट नसेलच ..

ती असेल सुरवात,  नव्या नात्यांची ,
अन "मीच" मला नव्याने कळलेल्याची
काही जुनी नाती नव्याने समोर येतील ...
अन काही कायमची तोडली जातील ..

 एक सुख मात्र असेल ..
शेवटी अशी माणसं माझ्याजवळ राहतील
जी फक्त माझीच असतील..


---BinaryBandya™

Thursday, August 5, 2010

मावळतीला स्वत:साठी रंग शोधणारा ढग मी ..

पावसाळ्यात इंद्रधनुसवे रंगणारा पावसाचा  थेंब मी
अन कधी कधी सात रंगाशी नाते जोडणारा इंद्रधनू मी

माझ्या पंखांसाठी फुलांचा रंग वेचणारे फुलपाखरू मी
अन कधी रंगासाठी आसुसलेला रंगपेटीतला कुंचला मी

तुझ्या डोळ्यात माझ्या स्वप्नांसाठी रंग शोधणारा वेडा मी
अन कधी उन्हाळ्यात उन्हासवेच रंगणारा प्रियकर गुलमोहर मी

कधी पहाटेला सूर्यासवे भगव्यात रंगणारा शुक्रतारा मी
अन कधी मावळतीला स्वत:साठी रंग शोधणारा ढग मी

 ---BinaryBandya™

Wednesday, July 21, 2010

लपंडाव

कायम सुरु असतो आठवणींचा लपंडाव
भावनांचा, शब्दांचा, अन नात्यांचा लपंडाव

कधी नाती माझ्यापासून लपतात
तर कधी मी त्यांच्यापासून ...
कधी शब्द माझ्यापासून लपतात
तर कधी मी त्यांच्यापासून ...

इच्छांचेही तेच , नात्यांचेही तेच
प्रेमाचेही तेच अन आप्तांचेही तेच ...

माझे मन, अन माझ्या सावल्या
माझे विचार, अन माझे प्रतिबिंब
ह्यांनी मांडलेला लपाछपिचा डाव
आयुष्य माझे म्हणजे एक लपंडाव


---BinaryBandya™