Monday, July 19, 2010

म्हटलं तर

एक प्रेम तुझे नि माझे
म्हटलं तर सगळ्यांसारखेच
अन म्हटलं तर जगावेगळे

एक खेळ भातुकलीचा तुझा नी माझा
म्हटलं तर सगळ्यांसारखाच
अन म्हटलं तर जगावेगळा

काही शब्द तुझ्या ओठांवरले गुलाबी अन बेधुंद
काही शब्द माझ्या मनातले प्रेमळ अन निश्चल
काही आपल्या नात्यासारखे नाजूक अन हळुवार
अशी ही तुझी-माझी आपली कविता
म्हटलं तर सगळ्यांसारखी
अन म्हटलं तर जगावेगळी

---BinaryBandya™

Thursday, July 1, 2010

फितूर

समोर तू आलीस की जगापासुनच तुटतो ,
कुठेतरी दुर समुद्रात एकटाच भरकटतो,
शप्पथ, समोर तू आलीस की मी मोहरतो...

समोर तु आलीस की
मी माझ्या शब्दांचा बहार पण बघितलाय...
अन समोर तु आलीस की
मी माझ्या कवितेचा जळफळाटही बघितलाय...

समोर तु अन माझे डोळे फितूर
समोर तु अन माझे श्वास फितूर 
समोर तु अन हृदयाची धडधड फितूर
समोर तु अन साला माझे मन पण फितूर...

स्वत:चे काय असे उरलय,
मनात वेगळच काहीतरी भरलय,
किती, कशाला अन का आवरु,
माझ्यातला मीच तुला फितूर...

---BinaryBandya™

Tuesday, June 15, 2010

मला हवाय एक पावसाच्या प्रेमात विरघळणारा रेनकोट...

मला हवाय एक पावसाच्या प्रेमात विरघळणारा रेनकोट,
हवी आहे एक वादळी वार्‍यावर फिदा असणारी,
अन त्याच्याबरोबरच फितूर होणारी छत्री ..

Thursday, May 27, 2010

आधार

 माणसे शोधतात कशाचा ना कशाचा आधार ,
मन मोकळे करण्यासाठी, अश्रू  ढाळण्यासाठी... 

माणसेच शोधतात कारणं अन माणसेसुद्धा  
आपल्या पराभवाचे खापर फोडण्यासाठी ...


अन माझ्यासारखे मात्र
शोधतात आडवळणाचे दोन चार शब्द,
कागदावर कोरायला ...

शोधतो हरवलेल्या, अन जराश्या क्लिष्ट कविता...
ज्या कवितांना कधीच यायचे नसते अशा माणसात,
कारणे अन आधार शोधणार्‍या अशा समाजात ...

Thursday, April 22, 2010

दमलेले ढग

परवा माझ्या दारावर आला एक तहानलेला ढग 
उन्हामुळे रापलेला,
तहानेने व्याकुळलेला,
कापसाचा गोळा म्हणावे असे तर त्याच्याकडे काहीच नाही,
अन पाउस ह्याच्याकडेच लपला असावा असे तर मुळीच नाही...

मी त्याला पाणी दिले अन विचारले
इतका का धावतो आहेस ?
असे काय लपवतो आहेस ?

तो बोलला विमान मागे लागले आहे ..
पाउस शोधणारे ...
पाउस मागणारे ...

मी ठरवणार, मी कुठे बरसायचे ?
कुणाला तरसवायचे !!!
म्हणून धावतोय ...
मी धावतोय माझ्या स्वातंत्र्यासाठी.. 
ज्यांनी निसर्गावर प्रेम केले,
धरती अन आकाशावर प्रेम केले
त्यांच्यासाठी ...

---

Saturday, April 17, 2010

वीज पडून वठलेले एक झाड

वीज पडून वठलेले एक झाड ,
विजेच्या आघाताने आयुष्याची राख झालेले झाड ..
पावसाळा संपला  , हिवाळा संपला  ,
उन्हाळाही जाळून निघून गेला ..

पण परत येणाऱ्या पावसाळ्यात ...
गडगडणार्‍या ढगांच्या , कडाडणार्‍या विजांच्या
बरसणार्‍या पावसाच्या गावी नसेलही हे झाड ..पण पुन्हा उभे आहे, डोंगराएवढे मन घेऊन हे झाड
पण पुन्हा उभे आहे, पोलादी छाती घेऊन हे झाड

अन मनातल्या मनात म्हणत असेल  -
"बघू आता परत कुठल्या विजेच्या प्रेमात जळणं होतंय"

Tuesday, March 9, 2010

स्वप्ने

त्या रात्री स्वप्नांच्या राज्यातली एक नदी
तिच्या डोळ्यात उतरली होती...
ती डोळ्यातुन स्वप्नं सांडत होती...
अन ती स्वप्ने वेचायचा मी निष्फळ प्रयत्न करत होतो...

माझी स्वप्ने , तिची स्वप्ने, आमची स्वप्ने
ज्या डोळ्यांत मी सजवली होती..
त्याच डोळ्यांतुन ती आज कितीतरी स्वप्ने सांडत होती...
अगणित...

निघून जाताना तिच्या डोळ्यातले एक स्वप्न
माझ्या तळहातावर विसावले होते,
अन तळहातावरल्या आसवामध्ये मात्र
मला फक्त माझच प्रतिबिंब दिसत होते..


---