Friday, June 24, 2011

जगणे माझे

कधी रुसवा होतो माझाच माझ्या देवाशी
मग रंगते भांडण माझेच माझ्याशी
स्वतःला मग स्वतःच समजवायचे
हृदयावर ओरखड्यांचे गोंदण सजवायचे

रंगही माझेच अन ढंगही माझेच 
रुसणेही माझेच अन फसणेही माझेच
त्याला तर नसते घेणे कशाशीच ...
जगणेही माझेच अन मरणेही माझेच

---BinaryBandya™ 

Monday, June 6, 2011

भिजलेला सूर्य

उन्हाळाभर मानगुटीवर बसलेला सूर्य
चार महिने नको तेवढा तापला
कालच्या पावसासोबत मात्र 
विरघळत विरघळत मातीत मिसळला

इथेतिथे साचलेल्या पाण्यात मग,
पावसानंतर का होईना
पण लहान मुलांसारखाच चिंब भिजला

मावळतीला बुडता बुडता मग,
ढगांच्या दुलईत
लहान मुलांसारखाच निजला


नुकताच पाउस पडून गेला होता. बाहेर फेरफटका मारावा म्हणून थंड हवेत फिरायला आलो.
पण थोड्याच वेळात सूर्य महाराज ढगातून बाहेर येऊन दर्शन देऊ लागले.
बिचारा रस्त्यावर साठलेल्या पाण्याच्या डबक्यात स्वतःला बघत बसला होता.
वाटले मागची ४ महिने नुसता मानगुटीवर बसून होतास, घामाने भिजवत होतास.
आता बघ कसं तुझं अगदी पिल्लू झालंय यार ...
त्या पाण्यात उडी मारायचा मोह मी टाळलाच. अन मनातल्या मनात म्हटले
"खेळ बाबा  तुही पाण्यात , तुलाही कधी कधी लागतच असेल की तहान"


---BinaryBandya™