Monday, December 14, 2009

तु ये


माझ्या अंगणात रांगोळी घालाया ये
परसदारात रातराणी फुलवाया ये

एकट्या माझ्या राती , एकटी माझी स्वप्ने
चांदण्या राती माझी स्वप्ने सजवाया ये

दिवस बेशिस्त, रात्र अस्वस्थ , कुस बदलुन थकते रात्र माझी
ह्या बैचेन रातीच्या प्रश्नांची उत्तरे सांगाया ये

तुझ्याशी भांडायचय पण मन कधीच धजावत नाही
असेच एकांती रुसुन-फुगुन माझ्याशी गोड गोड भांडाया ये

तुझ्यासाठी जिव अर्पण , तुझ्यासाठी माझे डोळे दर्पण
ह्या दर्पणासमोर लाजाळुसारखे लाजाया ये

मी उंबर्‍यात एकटाच उभा
आपल्या घराला तोरण बांधाया ये

मी कधीचीच वाट पाहतोय तुझी
देव्हार्‍यात तुझ्या घरचा कृष्ण ठेवाया ये
 
---



Friday, December 4, 2009

वेडा


एक एस.टी 'स्टँडवरचा माणूस'
मळलेली चड्डी ,
मळकट अन तेलकट असा लांबसा सदरा,
विस्कटलेले केस,
दोन पायात दोन वेगवेगळ्या चपला....

स्वता:शीच काहीतरी बोलत असतो,
कधी झाड , कधी पक्षी ,कधी प्राणी कोणाबरोबरही तो बोलत असतो,
प्रत्येकात तो स्वतःच्या कुठल्यातरी नातलगाला शोधत असतो...

अन हो त्याच्याकडे एक चिंध्याचे गाठोडे पण आहे,
त्यातल्या तो काही चिंध्या काढतो , काही फेकुन देतो ,
काही फाडतो, काहींच्या गाठी मारतो,
काही नवीन शोधुन आणुन त्यात परत भरतो,

हिच त्याची दिनचर्या....

त्याला सगळेच वेडा म्हणतात का कोणास ठावूक ?

मीही स्वता:शीच बोलत असतो तासनतास..
कुठल्याही माणसात शोधतो की मी पण मित्र ,नातलग, प्रेम...
माझ्याही विचारांचे माझ्यापाशी एक न दिसणारे गाठोडे आहे,
त्यातुन मी काही विचार मांडतो ,
काही काढुन फेकुन देतो , काही विचार बदलतो ,
काही नव्याने गाठोड्यात भरून ठेवतो..
मला मात्र कोणीच वेडा म्हणत नाही!!!

तो त्याच्या मनात येईल ते करतो
मी मात्र आतल्या आत घुसमटतो
मग कोण वेडा ? मी का तो...

तो आतही तसाच जसा बाहेरही
मी मात्र आतुन एक अन बाहेर एक..
मग कोण वेडा ? मी का तो...

त्याला नाही कुठली जात-पात
नाही कुठला देव अन धर्म
नाही कुठले बंधन
नाही कुठले प्रेम अन मत्सर
एकट्याच्या जगात एकटाच राजा...


अन मी मात्र अडकलोय
नको त्या बंधनात, नको त्या प्रेमात
नको त्या धर्मात, अन नको त्या देवात
केवढी गर्दी माझ्याभोवती
आप्तांची, मित्रांची, भावनांची, देवांची,
धर्मांची, जातींची, कुळांची अन माझ्याच विचारांची
तरीही मी एकटाच, सगळ्यात एकटाच....
मग कोण वेडा ? मी का तो...


त्याची जात, पात, धर्म, नाव, ओळख
सगळे काही एकच - वेडा अन फक्त वेडा
अन माझ्याकडे पहा..
एकही स्वता:ची ओळख नाही..
कोण मला हिंदु म्हणतो...
कोण मला मराठा , कोण ब्राह्मण
मग कोण वेडा ? मी का तो...



---